प्रस्तावना
भारत हा भाषिक विविधतेने नटलेला देश आहे. मात्र, इंग्लिश आणि भारतीय भाषांत वाचनास उपलब्ध असलेल्या साहित्याचा तुलनात्मक विचार केल्यास एक फरक आपल्यास ठळकपणे जाणवतो, तो म्हणजे भारतीय साहित्यातील कल्पज साहित्याचे वर्चस्व आणि तथ्यज साहित्याची वानवा. ह्या असंतुलनाचे परिणाम फार दूरगामी आहेत. आपल्या वाचनाच्या सवयींवर आणि ज्ञानग्रहणावर तर त्याचा परिणाम होतोच परंतु त्याहीपुढे जाऊन आपल्या संपूर्ण समाजमनावरच त्याचा खोलवर परिणाम झालेला जाणवतो. ह्या असंतुलनाची कारणमीमांसा आणि भारतीय भाषांत अधिक प्रमाणात, दर्जेदार, तथ्यज साहित्य निर्माण करण्याची आवश्यकता, ह्यांवर एक दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न ह्या टिपणात केला आहे.
मानवी मन : कल्पज साहित्याचे माहेरघर
भारताला, केवळ मौखिक परंपरेचाच नव्हे तर एकंदरीत साहित्याचा समृद्ध आणि तितकाच विस्तृत वारसा लाभलेला आहे. रामायण आणि महाभारत ह्यांसारख्या महाकाव्यांतून आपली जडणघडण झाली आहे, आपल्या साहित्य आणि संस्कृतीचा तो गाभा आहे, आणि त्याचा वारसा आजवर चालत आलेला आहे. भारतीय भाषांत, कादंबऱ्या, लघुकथा, गोष्टी, पौराणिक कथा-कहाण्या, आणि त्यांचे आधुनिक अवतार, ह्या सर्वांद्वारे कल्पज साहित्य फोफावत आहे. ह्याला मराठी आणि हिंदीचाही अपवाद नाही. कल्पज साहित्य हे मनोरंजनाचे साधन आहे आणि त्याने कल्पनाशक्तीचेही भरणपोषण होते. त्यातून कलानिर्मितीही होते आणि कधीकधी समाजाविषयीचे भाष्यही! त्यामुळे त्याचे महत्त्व अधोरेखित करण्याची आवश्यकता नाही. परंतु तरीही, पुस्तकांच्या दुकानांत, वाचनालयांत किंवा अगदी समाजमाध्यमांमध्येही कल्पज साहित्याची अतिव्याप्ती थोडी अस्वस्थ करते. कल्पज साहित्याच्या भडिमाराने बहुतांश लोकांची तथ्यज साहित्याचा शोध घेण्याची आणि त्यातून ज्ञानग्रहण करण्याची क्षमता खुंटते. ह्याचा अर्थ, तरुण वाचकांना एकतर दैनंदिन व्यावहारिक गोष्टीही खोलात जाऊन, अभ्यासपूर्ण, आणि संशोधक वृत्तीने समजून घेण्याची सवयच होत नाही किंवा तशी गोडीही लागत नाही. आणि दुसरे असे की, ज्यांना महत्त्वाच्या विषयांवर दर्जेदार तथ्यज साहित्य वाचण्याची इच्छा असेल त्यांना ते भारतीय भाषांत उपलब्धच होत नाही, त्यासाठी मग त्यांना इंग्लिशचाच आधार घ्यावा लागतो.