तथ्यज साहित्य गैरसोयीचे
क्वचितप्रसंगी, जगण्याविषयी भाष्य करताना, कल्पज साहित्य कालातीत, उच्च कलात्मक दर्जा प्राप्त करतेही. मात्र, बहुधा ते मनोरंजनात्मकच असते, रोजच्या धबडग्याचा विसर पाडणारा तो एक विरंगुळा किंवा वास्तवापासून काढलेली पळवाट, असेच त्याकडे बघितले जाते. गुन्हेअन्वेषण, हेरगिरी, प्रणयकथा, धार्मिक, व इतर अनेक प्रकारांतील कल्पज साहित्याचा खप जास्त असतो आणि अनुषंगाने प्रकाशकांची कमाईदेखील. कारण अशा साहित्यातून वाचक मनोरंजन आणि उत्तेजना ह्या दोन्हीं गोष्टी प्राप्त करू शकतात. त्यामानाने, तथ्यज साहित्य वाचकांना तितकेसे आकर्षक वाटत नाही, कारण ते गंभीर प्रकृतीचे असते. त्याची गोडी लागण्यास वाचकाला वेळ लागतो, प्रयत्न करावे लागतात. त्यातून अर्थबोध करून घेण्यासाठी मनाची एकाग्रता लागते, अभ्यासूवृत्ती लागते. परक्या, अनोळखी मुलुखात मुशाफिरी करण्याचे धैर्य लागते. त्यामुळे, कल्पज साहित्याच्या मोहिनीसमोर तथ्यज साहित्य नेहमीच फिके पडते. पाठ्यक्रमाबाहेरील, अवांतर, तथ्यज पुस्तके वाचण्यासाठी किंवा माहितीपट बघण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचाही आपल्याकडे प्रघात नाही. केवळ पाठांतरावर भर देणाऱ्या शिक्षणपद्धतीची आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागते आहे. ह्यातून आपण असे असंख्य झापडबंद पदवीधर निर्माण करत आहोत ज्यांना इतरांनी दिलेले प्रश्न सोडवण्याची, केवळ लक्ष्यकेंद्री विचार करण्याची, सवय लावली गेली आहे. ह्यामुळे सांगितलेले काम निमूटपणे करणारे, सांगकामे कर्मचारी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत, परंतु त्यांच्यात सर्जनशीलता, चिकित्सकवृत्ती, जोखीम घेण्याची क्षमता, निर्माण करता येत नाही. नवीन, अवघड आव्हाने पेलण्याची क्षमता असलेले कल्पक नेतृत्व त्यामुळे आपल्याकडे घडवता येत नाही. मग आपल्याकडील प्रकाशकही, काही अपवाद वगळता, त्यांना गैरसोयीचे असे तथ्यज साहित्य प्रकाशित करण्यापेक्षा, विक्रीस सोपे, जोखिमशून्य, कल्पज साहित्यच प्रकाशित करण्याचा धोपटमार्ग निवडतात, ह्यात नवल ते कसले?

तथ्यज साहित्य: प्रगल्भतेचे लक्षण
लहानपणापासून वाचनाची सवय असणाऱ्यांचा विचार करता असे लक्षात येईल की जसजशी प्रगल्भता येते तसतशी वाचनाची सवयही बदलत जाते. लहानपणी आवडणारे मनोरंजक साहित्य हळूहळू बाजूला पडत जाते आणि जास्त व्यामिश्र, तथ्यज साहित्याकडे कल वाढत जातो. असा बदल घडून येण्यामागे बरेच घटक कार्यरत असतात. त्यांपैकी एक असतो आपली व्यक्तिमत्व विकासाची इच्छा. तर दुसरा असतो ह्या व्यामिश्र जगाला यथार्थ माहितीद्वारे जाणून घेण्याची इच्छा. तरुणवर्ग वास्तविकजगात त्यांना उपयुक्त असलेल्या गोष्टींत जास्त गुंतलेला असतो. त्यांना, गुंतागुंतीच्या प्रसंगांतून मार्ग काढण्यास ज्याने मदत होईल, ज्याने करिअरमध्ये प्रगती करता येईल, वैयक्तिक विकासास मदत होईल, सामाजिक वास्तव समजून घेण्यात मदत होईल, अशी माहिती हवी असते. अशी माहिती पुरवण्यात तथ्यज साहित्य, म्हणजे वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके, माहितीपट, इ. महत्त्वाची भूमिका निभावतात. इतिहास, अर्थकारण, मानसशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, आणि व्यक्तिमत्व विकास, अशांसारख्या विविध विषयांवर वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह माहिती आणि ज्ञान त्यातून मिळू शकते. तथ्यज साहित्य आपल्याला आजच्या जगात जगण्यास आवश्यक असलेली साधने पुरविते. ते, वाचकाला विविध कल्पना, दृष्टिकोन देते. स्थानिक आणि जागतिक वस्तुस्थितीविषयीची त्याची समज वाढविते. एक चांगला, सुजाण समाज घडवण्यास मदत करते. औपचारिक शिक्षणास जोड देऊन वाचकांना विविध विषयांत मर्मज्ञता, व्यावहारिक ज्ञान मिळवण्यास मदत करते. तथ्यज साहित्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक वाढीस आवश्यक अश्या चिकित्सक वृत्ती, विवेकी निर्णय घेण्याची क्षमता, जिज्ञासा आणि तिचे तथ्याधारित निरसन ह्या गुणांची मशागत होते.

दृष्टिकोनांचा अभाव
तथ्यज साहित्याच्या अनुपलब्धतेमुळे लोकांचे वाचन खुंटते आणि त्यांना काल्पनिक आणि वास्तविक ह्यांतील फरक ओळखणे, तर्कशुद्ध विचार करणे, अवघड वाटू लागते. जगाशी व्यवहार करण्यास ते ज्या भाषेत प्रथम शिकले, त्या त्यांच्या मातृभाषेत असे साहित्य जर त्यांना उपलब्ध झाले नाही तर ते अधिकच जाणवते. भारतीय भाषांत शिकलेल्या बहुसंख्य भारतीयांना मग इंग्लिशमधील तथ्यज साहित्याच्या प्रचंड साठ्याचाही उपयोग करून घेता येत नाही. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन संकुचित होत जातो, जागतिक घटनांशी/ परिस्थितीशी संबंध तुटत जातो. ज्यांना तथ्यज साहित्य वाचण्याची इच्छा असते त्यांना मग दुधाची तहान ताकावर, म्हणजे इंग्लिशमधून त्यांच्या मातृभाषेत अनुवादित साहित्यावर भागवावी लागते.

आपण काय करायला हवे?
ह्या असंतुलनावर एक उपाय म्हणून तरुणवर्गासाठी वाचनालयाचा/पुस्तकालयाचा प्रयोग करून बघता येऊ शकेल. ह्यात मराठी, हिंदी, आणि इंग्लिशमधील, प्रत्येकी शंभर, निवडक, रसपूर्ण आणि आकर्षक, तथ्यज पुस्तके असावीत. हे काम सगळ्यांच्या सहकार्याशिवाय होणे शक्य नाही. म्हणून हे आवाहन. ह्या वाचनालयात असायलाच हवीत अशी, आपल्या पाहण्यातील पुस्तके सुचवावीत. सुचवलेल्या पुस्तकांचा त्यांच्या महत्त्वानुसार क्रम ठरवावा आणि प्रत्येक पुस्तकाविषयी निदान एक-दोन परिच्छेद तरी आपण लिहून पाठवावेत. जे लोक वाचनप्रेमी आहेत आणि जे विशेषतः तथ्यज पुस्तकांची वाचनसंस्कृती वाढवू इच्छितात, अशा सर्व समविचारी मित्रमंडळींकडून हे योगदान यावे, अशी आमची इच्छा आहे. उपयुक्तता आणि रंजकता ह्यांचा मेळ साधणारी ही पुस्तके असावीत, ह्याकडे मात्र दुर्लक्ष होऊ नये. नववाचकांना मोठ्या, जाडजूड पुस्तकांचे दडपण वाटू शकते. त्यामुळे ह्या पुस्तकांची सरासरी पृष्ठसंख्या 150च्या आसपास असावी. भाषा सोपी व रसपूर्ण असावी आणि मांडणी आकर्षक. वाचनानुभव आनंददायी होण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गरज भासल्यास पुस्तकाची पुनर्मांडणी करून, अधिक आकर्षक बनवून पुनर्प्रकाशित करण्याचीही आवश्यकता पडू शकते. त्यासाठी कॉपीराईटमुक्त पुस्तकांपासून सुरुवात करावी लागेल. पुढे जाऊन कॉपीराईट असलेल्या पुस्तकांचेही संबंधितांची परवानगी घेऊन पुनर्प्रकाशन करता येईल. काही इंग्लिश पुस्तकांचे मराठी आणि हिंदीत अनुवाद करूनही आपण ती पुढे प्रकाशित करू. हे सर्व करण्यासाठी, निरूपक फाउंडेशन ह्या ना नफा प्रतिष्ठानाची स्थापना करण्यात आली आहे. हा निरूपक, भारतीय भाषांत निरूपण, चित्रण/वर्णन, करण्याचा यत्न करेल. सुरुवातीला मराठी आणि हिंदीत, आणि पुढे जसजसे मार्गक्रमण होईल तसतसे इतर भाषांत. निरूपक अशा कसदार तथ्यज साहित्याची निर्मिती आणि प्रसार करेल, जे संशोधकवृत्तीने, अभ्यासपूर्ण रीतीने, लिहिले गेलेले असेल, समजण्यास सोपे, सुरस आणि चित्तवेधक असेल, आणि विशेषकरून जे आजच्या जीवनावश्यक, परंतु तरीही दुर्लक्षित विषयांवर असेल. येत्या आर्थिक वर्षात हे कार्य विस्तारण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी आपल्या सहकार्याची आम्ही खात्री बाळगतो. दरम्यान, ह्या निकषांत बसतील अशी मराठी, हिंदी आणि इंग्लिश ह्या तिन्हीं भाषेतली कितीही पुस्तके आपण ह्या वाचनालयाकरता सुचवू शकता. तुम्ही सुचवणार असलेल्या पुस्तकांची माहिती खालील स्वरूपात पाठवावी. • पुस्तकाचे नाव • लेखक • पुस्तक परिचय (कमीत कमी १-२ परिच्छेदात) • हे पुस्तक ह्या उपक्रमासाठी योग्य का वाटते? ही माहिती https://forms.gle/ehpzYd1UaEvwpd4E9 येथे भरू शकता किंवा खालील ईमेलवर अथवा पत्त्यावर पाठवू शकता.
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत
आपले
प्राजक्ता अतुल